शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:35+5:302021-02-17T04:39:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या अडेलतट्टू आणि निष्ठूर केंद्र सरकारविरोधात लाखो शेतकरी आंदोलनात रस्त्यावर उतरले. पण सरकार अजूनही बधले नाही, हे पाहून संयुक्त किसान मोर्चाने १० फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत तिन्ही कृषी कायदे व वीज विधेयक रद्द करा आणि रास्त हमीभाव देणारा कायदा संमत करा, या मागण्यांकरिता देशभर आंदोलन तीव्र करणाऱ्या अनेक कृती जाहीर केल्या आहेत.
गेल्या ८० दिवसांपासून अखंड सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या विविध सीमांवर आजवर २२८ शेतकरी शहीद झाले आहेत. रविवारी अंबाजोगाईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मशाल रॅली काढून शहिदांना आदरांजली व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवान पोटभरे, किसान सभेचे मुरलीधर नागरगोजे, डी. वाय. एफ. आय.चे अजय बुरांडे, प्रा. सुभाष धुळे, प्रशांत मस्के, सुहास चंदनशीव, देविदास जाधव, महेश देशमुख, खय्युम शेख, भागवत जाधव, महेश देशमुख, ऊत्रेश्वर इंगोले, विशाल देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी, विद्यार्थी, युवक सहभागी झाले होते.
संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून १४ फेब्रुवारी या पुलवामा घटनेच्या दिवशी शहीद झालेल्या सैनिकांना आणि शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती मोर्चे, मशाल मार्च आणि अन्य कार्यक्रम देशभर आयोजित केले होते. याच अनुषंगाने अंबाजोगाईतही रविवारी मशाल रॅली काढण्यात आली.