स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ३० वर्षांनंतर बीडकडे प्रतिनिधित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:16 PM2018-06-13T16:16:19+5:302018-06-13T16:16:19+5:30
अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडे असलेली जागा भाजपने खेचून आणली आहे. बीड जिल्ह्याकडे ३० वर्षानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आले आहे.
बीड : लातूर- बीड - उस्मानाबाद विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस विजयी झाले. अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडे असलेली जागा भाजपने खेचून आणली आहे. बीड जिल्ह्याकडे ३० वर्षानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आले आहे.
जिल्ह्यातील सध्या बदलत असलेल्या राजकीय समिकरणातून भाजपला हे यश मिळाले असल्याने आगामी निवडणूकीत ते फायद्याचे ठरणार असल्याचे मानले जात आहे. तर या निकालाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने चिंतन करावे लागणार आहे. जिल्हयातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची घडी विस्कटल्याने तसेच कॉँग्रेस व राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव राहिल्याने भाजपची सरशी झाली. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी निकालावर सावध भाष्य केले.
३० वर्षानंतर बीड जिल्हयाकडे प्रतिनिधित्व
लातूर- बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ३० वर्षानंतर बीड जिल्हयाकडे या निवडणुकीच्या निमित्ताने आले आहे. यापूर्वी स्व. बाबुराव आडसकर यांनी प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर उस्मानाबादकडे व नंतर लातूरकडे १८ वर्ष हे प्रतिनिधीत्व होते. या निवडणुकीच्या निमित्ताने आष्टी मतदार संघाचे भाग्य उजळले.
जिल्ह्यातील चौघे विधान परिषदेवर
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुरेश धस यांना २०१९ च्या निवडणुकीआधीच आमदारकीची संधी मिळाली. आष्टी- पाटोदा -शिरुर मतदार संघाला दोन आमदार लाभल्याने विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडीत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यानंतर सुरेश धस हे विधान परिषदेचे जिल्ह्यातील चौथे सदस्य आहेत.