गोर-गरिबांच्या सौभाग्य योजनेतून दिली रो-हाउस प्रकल्पाला वीज; माजलगावात महावितरणचे अभियंता-लाइनमन निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:48 PM2018-11-29T18:48:17+5:302018-11-29T18:49:04+5:30
वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नीलेश तलांडे व लाइनमन चेतन भंडारकर या दोघांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
माजलगाव (बीड ) : केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत गोर-गरीबांना वीज कनेक्शन देण्याऐवजी येथील शिवशारदा रो-हाउस प्रकल्पाला वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर देण्यात येत असल्याचे उघडकीस झाले. यावरून वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नीलेश तलांडे व लाइनमन चेतन भंडारकर या दोघांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
महावितरणाच्या सौभाग्य योजनेमध्ये मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येत. येणार आहे. ज्या लोकांचे नाव यादीत समाविष्ट आहे त्यांना मोफत वीज कनेक्शन व एलइडी बल्ब देण्यात येतो ,ज्या ठिकाणी विजेच्या खांबांची व्यवस्था नाही तेथे खांब उभे करून मोफत कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर दिले जाते. जेथे लाइनची व्यवस्था नाही तेथे सौरऊर्जा प्लेट व एलइडी बल्ब देण्यात येतात.
मात्र, या योजनेतील गरजूंना वीज देण्याऐवजी माजलगाव ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता नीलेश रतन तलांडे व लाइनमन चेतन मनोहर भंडारकर यांनी शहरास खेटून असलेल्या शिवशारदा रो-हाउसेसला सौभाग्य योजनेतून ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा घाट घातला. त्यांनी केसापुरी वसाहत ते फुले पिंपळगाव रोड अशी एचटी लाइन उभी केली येथे नवीन सहा खांब उभे केले. मात्र, कागदोपत्री रो-हाउसला कनेक्शन न म्हणता आमराई वस्ती,फुले पिंपळगाव रोड असे दाखवून वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता या दोन्ही गावांच्या हद्दीत आमराई वस्ती कोठेच नाही असा अहवाल संबंधित गावच्या ग्रामसेवकांनी दिला.
या प्रकरणी फुले पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख जुनेद यांनी वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचेकडे असा प्रकार घडत असल्याची तक्रार केली. त्याची बकोरिया यांनी तात्काळ दखल घेतली व चौकशीचे आदेश दिले. अधीक्षक अभियंता बि. एस. निर्मळ व अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता वग्यानी यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली असता त्यामध्ये अभियंता तलांडे व लाइनमन भंडारकर दोषी असल्याचे दिसून आले. त्यावरून अधीक्षक अभियंता निर्मळ यांनी तलांडे व लाइनमन भंडारकर यांना मंगळवारी निलंबित केल्याची माहिती कार्यकारी अभियंता वग्यानी यांनी दिली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.