बीडमध्ये रस्त्यात अडवून वाहनधारकांना लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:41 PM2018-12-20T18:41:55+5:302018-12-20T18:50:05+5:30
एका रात्रीत किमान सात ते आठ जणांना लुटतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बीड : रात्रीच्या वेळी रस्त्यात अडवून वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अट्टल गुन्हेगारांचा समावेश असलेल्या पाच जणांना बुधवारी मध्यरात्री गेवराई तालुक्यातील मादळमोही रस्त्यावर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध साहित्य जप्त केले आहे.
अविनाश कल्याण धुरंधरे (वय २९, रा. तेलगाव नाका, बीड), लहू सुभान हातागळे (वय ३५), शेख शफीक शेख नईमोद्दीन (वय ३७, दोघेही रा. काळा हनुमान ठाणा, बीड), संजय हरिभाऊ कारके (रा. वारोळा, ता. माजलगाव), पप्पू बाबूराव अडागळे (वय २५, रा. एरंडगाव, ता. गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
बुधवारी मादळमोही - पाडळसिंगी रस्त्यावर ही टोळी दबा धरुन बसल्याची माहिती सपोनि दिलीप तेजनकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. रस्त्याच्या कडेला जीप उभी करुन हे पाचही जण रस्त्यावर दोरी आडवी टाकून वाहनधारकांना पाडण्याच्या तयारी होते. याचवेळी एलसीबीच्या पथकाने दबा धरुन बसलेल्या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कटावणी, लोखंडी रॉड, लोखंडी गज, स्क्रू ड्रायव्हर, दोर, पक्कड यासह जीप (एमएच ०६ जे ४३२४) जप्त करण्यात आली आहे. या सर्वांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सर्वांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पो. नि. घनशाम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, साजीद पठाण, नसीर शेख, विष्णू चव्हाण, गणेश नवले, सुग्रीव रुपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.
अविनाश टोळीचा म्होरक्या
अविनाश धुरंधरे हा टोळीचा म्होरक्या आहे. लहू हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अविनाशच्या सांगण्यावरुनच ते वाहनधारकांची लुटमार करीत असत. बीडसह शेजारील जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
कारागृहात झाली ओळख
अविनाश व लहू यांची कारागृहात ओळख झाली. त्यानंतर त्यांनी पप्पू, संजय व शफीकला सोबत घेत टोळी तयार केली. त्यानंतर लुटमारीचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दोरीने हातपाय बांधून करतात मारहाण
दुचाकीस्वार दोरीला अडकून पडल्यानंतर त्याला तात्काळ बाजूच्या शेतात नेले जाते. दुसरा एकजण दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतो. तिघे मिळून दुचाकीस्वाराचे हातपाय बांधतात आणि मारहाण करुन त्यांच्याजवळील किंमती मुद्देमाल काढून घेतात. एका रात्रीत किमान सात ते आठ जणांना लुटतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले.