पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीला; पहाटेच्या गाढ झोपेत असताना मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:41+5:302021-01-16T04:37:41+5:30
कडा (जि. बीड) : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना वस्तीवर असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत सामानाची ...
कडा (जि. बीड) : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना वस्तीवर असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत सामानाची उचकापाचक करून धान्यविक्रीतून आलेले पट्टीचे रोख एक लाख रुपये व अडीच तोळे सोने असा एक लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना पाटण सांगवी येथील मांढरे वस्तीवर घडली.
चोरट्यांंविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील नवनाथ बबन मांढरे हे मांढरे वस्तीवर असलेल्या घरी गुरुवारी रात्री मुलाला घेऊन पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पत्नी, आई, वडील घरात झोपलेले असताना शुक्रवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या गाढ झोपेत असताना घराचा दरवाजा उघडून आता प्रवेश केला. कांदा व तूरपिकाची विक्री करून आलेले पैसे घरात ठेवले होते. सामानाची उचकापाचक करून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले एक लाख रुपये व अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ७५ हजार रुपयांंचा ऐवज असलेली पेटी शेतात नेऊन त्यात असलेली रक्कम व सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात नवनाथ बबन मांढरे यांनी चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
घरातील लोक जागे होताच दुसरीकडे मारला डल्ला
शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास याच वस्तीवरील अंकुश नानाभाऊ जगताप यांच्या घरात चोरट्याने प्रवेश करताच ते जागे झाल्याने त्यांनी तिथून धूम ठोकली. रिकाम्या हातांनी परततच तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मांढरे यांच्या घरी डल्ला मारला.