नेकनुरातील नदी पात्रातून वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:02+5:302021-07-23T04:21:02+5:30
पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची ...
पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना-जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल, तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढवल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.
स्मशानभूमीत शेड उभारावेत
वडवणी : तालुक्यात जवळजवळ सर्वच गावांत अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीकाठी किंवा शेतात उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वडवणी तालुक्यात ४५ गावांचा समावेश असून, ३५ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत आहे. यापैकी केवळ कवडगाव, देवडी, खळवट लिमगाव, देवगाव, काडीवडगाव, कुप्पा, तिगाव, चिंचाळा या गावांना स्मशानभूमी असून, उर्वरित गावांत सुविधाच नाही. गैरसोय टाळण्यासाठी स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी होत आहे.
धारूर-आसोला रस्त्याची दुरवस्था
धारूर : धारूर ते असोला या आठ किलोमीटर रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागून गेले आहेत. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ प्रशासनाने बुजवावेत तसेच वाहनांचे होणारे नुकसान व अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
बीड : गेल्या काही दिवसांपासून शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या वाढल्याने नागरिकांत घबराट असून, त्यांच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मागील चोरीच्या प्रकरणात तपास लागत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. या चोऱ्यांना आळा घालून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.