परळी : तालुक्यातील गाढे पिंपळगांव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला २०१७-१८ मध्ये प्रभारी मुख्याध्यापक नेमला नसल्याने व शालेय व्यवस्थापन समिती ही नियुक्त करण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. असा आरोप करत गुरूवारी ग्रामस्थ व पालकांनी शाळेत वर्ग भरण्यास विरोध दर्शविला व शाळेच्या बाहेरच प्रांगणात विद्यार्थी बसवून शाळा बंद ठेवली.
दरम्यान शुक्रवारी होणाºया वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास स्थानिक पुढारी नको असा आग्रह काही ग्रामस्थांनी केला होता. याची दखल घेत हे संम्मेलन पुढे ढकलण्यात आले. या आंदोलनानंतर परळीचे गटशिक्षणाधिकारी के. जी. खरात यांनी ग्रामस्थांची गाढे पिंपळगांव येथे भेट घेऊन समजूत काढली. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून उंबरेवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याची यावेळी घोषणा झाली. या घोषणेनंतर ग्रामंस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.गावचे माजी सरपंच शरद राडकर यांनी शाळे विषयीची तक्रार गटशिक्षण अधिका-यांना करताना सांगितले की, येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत २०१७-१८ मध्ये शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती गठीत केली नाही. बोगस अध्यक्ष बनून बिले उचलली आहेत. या संदर्भातले पुरावे गटविकास अधिकारी कार्यालयास देण्यात आले आहेत. परंतु अद्याप दोषींवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शाळेतील नवीन शौचालय, सिलिंग फॅन व ई-लर्निंगसाठी आलेला खर्च कशावर केला असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला. मुख्याध्यापक शिक्क्याचा गैरवापर होत आहे हे निदर्शनास आणून देखील कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात ८ महिन्यांपूर्वी तक्रार करण्यात आली होतीे. परंतु अद्याप कुठलीही तक्रार घेतली नसल्याने ग्रामस्थ व पालक संतप्त झाले होते. गटशिक्षणाधिकारी शाळेत आल्याशिवाय गुरूवारपासून शाळा उघडू दिली जाणार नाही असा ही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.