एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार लटकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:20+5:302021-08-17T04:38:20+5:30
बीड : जिल्ह्यात लॉकडाऊनंतर लालपरी वेगाने धावू लागली असली तरी आर्थिक परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. उत्पन्न कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे ...
बीड : जिल्ह्यात लॉकडाऊनंतर लालपरी वेगाने धावू लागली असली तरी आर्थिक परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. उत्पन्न कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याचे दिसते. जून महिन्याचे वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने श्रावणात शिमगा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आगोदरच वेतन कमी आणि त्यातही वेळेवर मिळत नसल्याने ते वैतागले आहेत.
जिल्ह्यात आठ आगार आहेत. जवळपास तीन हजार अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. यावर्षी कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून लालपरीची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. गतवर्षात तर लालपरी अनेक महिने जागेवरच उभा होती. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने लालपरी पुन्हा रस्त्यावर धावताना दिसत आहे. असे असले तरी ती पूर्वपदावर आलेली नाही. आजही बसेस तोट्यातच धावत असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही होत आहे. जून महिन्याचे कसेतरी वेतन झाले; परंतु ऑगस्ट महिना अर्धा उलटला तरी अद्यापही जुलै महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. हे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--
जून महिन्याचे वेतन अदा करणे बाकी आहे, हे खरे आहे. येत्या आठवडाभरात वेतन दिले जाणार आहे.
अजय मोरे, विभाग नियंत्रक
---
वेतन नसल्याने अनेक अडचणी आहेत. मुलांचे शिकवणी शुल्क, घर भाडे, आदी पैसे भरायचे कोठून असा प्रश्न आहे. आगोदरच वेतन कमी, त्यातही ते वेळेवर मिळत नाही.
एस. आर. घरत, चालक बीड आगार
----
एकूण आगार ८
अधिकारी २९
कर्मचारी २८३४
बसचालक ९४७
वाहक ११०३