सोमनाथ खताळ
बीड : बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ० ते ५ या वयोगटातील तब्बल ८८८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरासरी प्रत्येक दिवसाला एक बालमृत्यू होत आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य विभागाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना, जननी सुरक्षा, जननी शिशू सुरक्षा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदींचा समावेश आहे. तसेच कुपोषण रोखण्यासाठी मोफत आहारही दिला जातो. असे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ मध्ये जन्मल्यानंतर ० ते १ वयोगटात ३६३ तर २०१८-१९ मध्ये ३५६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ० ते ५ वयोगटात २०१७-१८ मध्ये ८९ तर २०१८-१९ मध्ये ८० बालकांचा जीव गेला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे जंतुसंसर्ग व न्यूमोनियामुळे झाले आहेत. गरोदरपणात योग्य काळजी न घेणे, डॉक्टरांचा सल्ला, वेळच्यावेळी तपासणी न केल्यामुळे संतुलीत आहार न घेतल्यामुळे मातेची प्रकृती खालावते. याचा परिणाम गर्भावर होतो. यासह रूग्णालयातील घाणीचे साम्राज्य व इतर कारणांमुळे बालकाला जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होतो. यामुळेच बालकांचा जीव जास्त प्रमाणात जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.एका वर्षांच्या आत ४४३ मृत्यूजंतुसंसर्ग, गुदमरने, फुफ्फुसाचा आजार, जुलाब, ताप, गोवर आदी कारणांमुळे अवघ्या ० ते १ वर्षे वयोगटात तब्बल ७१९ बालमृत्यू झाले आहेत. तसेच ० ते ५ वर्षे वयोगटात १६९ बालमृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी मागील दोन वर्षातील आहे.० ते १ वर्षे वयोगटात दोन वर्षात ७१९ तर १ ते ५ वर्षे वयोगटात १६९ बालमृत्यू झाले आहेत. योजना राबविण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे. दोन वर्षात ८८८ बालमृत्यूची नोंद आहे.- डॉ. संजय कदम, माता व बालसंगोपन अधिकारी, बीड