धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:29 PM2021-12-24T17:29:04+5:302021-12-24T17:32:50+5:30

मृतांच्या यादीत ५३२ नावे; २१६ नावे आली कशी?

Shocking! Names of survivors on the Corona death List | धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड

धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड

Next

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) : आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३१६ असताना शासकीय मदतीसाठी देण्यात येणाऱ्या यादीत मात्री ५३२ नावे समाविष्ट केली आहेत. अधिक माहिती घेता मृतांच्या यादीत चक्क जिवंत असलेल्या व्यक्तींचा समावेश केल्याचे आढळून आले असून प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा समोर आला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. या अनुषंगाने महसूल व स्थानिक प्रशासनाकडून यादी केली जात आहे. अंबाजोगाई शहरातील मृतांची यादी तहसीलदार विपिन पाटील यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविली. नगर परिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी करताना शहरात जिवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मृत म्हणून समावेश झाल्याचे उघड झाले. नगर परिषदेचे कर्मचारी आज सामाजिक कार्यकर्ते नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे खातरजमा करण्यासाठी गेले. यावेळी आपले नाव मृतांच्या यादीत समाविष्ट असल्याचे पाहून खुद्द नागनाथ यांना धक्काच बसला. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुटुंबाच्या बाबतीत घडला. जिवंत व्यक्तींची नावे मृतांच्या यादीत समाविष्टच झालीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

मृत ३१६ तर यादीत ५३२ नावे
अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मात्र, मृतांच्या यादीत ५३२ नावांचा समावेश आहे. ही उर्वरित २१६ नावे आली कुठून, याचा शोध आता प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे. या यादीत आणखी किती जिवंत व्यक्तींचा समावेश झाला आहे, त्याचीही पडताळणी करावी लागणार आहे.

खात्री करूनच होईल यादी प्रसिद्ध
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या यादीची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर नगर परिषद व ग्रामपंचायतींना शहानिशा करण्याचे आदेश दिले आहेत. यादीतील त्रुटी व चुका दुरुस्त करूनच यादी तयार केली जाईल.
- विपिन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई

Web Title: Shocking! Names of survivors on the Corona death List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.