धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 03:11 PM2024-12-07T15:11:17+5:302024-12-07T15:12:09+5:30

बनावट औषध पुरविणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Shocking! Supply of fake medicines to SRT Government Hospital, Ambajogai | धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा करणारी एक टोळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तर अशी बनावट औषधे पुरविणारे रॅकेटही आगामी काळात उघडकीस येईल, अशी शक्यता समोर येत आहे.

मराठवाड्यातील रुग्णांचे आधारस्तंभ म्हणून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयात दररोज किमान १६०० ते १८०० रुग्ण उपचारासाठी येतात. अशा या रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची तक्रार समोर आली आहे. स्वाराती रुग्णालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी स्वारातीच्या औषध भंडारास भेट दिली. त्यांचे सहायक प्रशांत पुरणवाड व ज्ञानोबा राठोड या फार्मासिस्ट यांनी रुग्णालयातून ॲझिमॅसिन-(५००) (AZIMCIM-५००) या औषधांचे सॅम्पल नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांची तपासणी होऊन २३ ऑक्टोबर २०२४ रोजी आलेल्या अहवालात सदरील औषध हे रुग्णांसाठी निष्क्रिय व बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर या औषधांचा पुरवठा विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर यांच्याकडून झाल्याचे समोर आले. त्यांनी रुग्णालयास २५ हजार ९०० टॅबलेटचा पुरवठा केला होता.

पुढे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असता काबीज जनरिक हाऊस मीरा रोड (ठाणे) फार्मसिस्ट बायोटेक्ट, टेनामेंट डिंडोली (सुरत), ॲक्वेटिस बायोटेक प्रा. लि. नालासोपारा (भिवंडी) यांनी ही बनावट औषधे रुग्णालयास पुरविली असल्याचे समोर आले आहे. बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील (कोल्हापूर), मिहीर त्रिवेदी (नारपोली, भिवंडी), द्विती त्रिवेदी (डिंडोली, गुजरात) व विजय शैलेंद्र चौधरी (मीरारोड, ठाणे) या चौघांविरुद्ध बनावट औषधांचा पुरवठा करून फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कांबळे करीत आहेत.

औषधांचे घटक नसणाऱ्या औषधांचा पुरवठा
स्वाराती रुग्णालयास पुरविण्यात येणारी ॲझिमॅसिन ५०० ही गोळी अँटिबॉयेटिक म्हणून रुग्णांसाठी देण्यात येत होती. मात्र, या गोळीमध्ये औषधांचे जे घटक आवश्यक आहेत, ते घटक नसल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आले. म्हणून या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- मनोज पैठणे, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, बीड

औषध पुरवठा थांबविण्यात आला
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून औषध पुरवठा होतो. त्यानुसार ही औषधे अंबाजोगाईत रुग्णांसाठी आली होती. मात्र ही औषधे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा औषध पुरवठा थांबविण्यात आला. हे औषध वरिष्ठ पातळीवरून बंद करण्यात आले आहे.
- डॉ. शंकर धपाटे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई

Web Title: Shocking! Supply of fake medicines to SRT Government Hospital, Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.