धक्कादायक ! कॉलेजमधून परतणाऱ्या बारावीतील मुलीचे भररस्त्यातून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 07:09 PM2021-02-18T19:09:05+5:302021-02-18T19:21:04+5:30
माजलगाव - गेवराई रोडवर माऊली फाट्यानजीक भररस्त्यावर घडला प्रकार.
माजलगाव : महाविद्यालयातून गावाकडे परतणाऱ्या अल्पवयीन मुलीस मारहाण करून माझ्याशी लग्न कर असे म्हणत अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. १७ ) दुपारी माऊली फाट्यानजीक भर रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी ( दि. १८ ) सकाळी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हरकी लिमगाव येथील बुधवारी सकाळी दोन बहिणी माजलगाव येथील महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. दुपारी दिडच्या दरम्यान परीक्षा देऊन त्या ऑटोरिक्षाने परत जात होत्या. माऊली फाट्यापर्यंत आल्यानंतर त्या गावाकडे पायी जात होत्या. यावेळी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास धनगर मळ्याजवळ त्यांच्याच गावातील अभिषेक गंगाराम निसर्गंध हा दुचाकीवर त्यांच्याजवळ आला. दोघी बहिणींना गाडीवर बसा म्हणू म्हणाला. यावेळी दोघींनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अभिषेकने लहान बहिणीला मारहाण केली. मोठीने प्रतिकार करताच तिलाही मारहाण केली. यानंतर अभिषेकने लहान बहिणीस माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तीचे अपहरण करून नेले. याप्रकरणी गुरुवारी सकाळी मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून अभिषेक गंगाराम निसर्गंध याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सावित्रीच्या लेकींना समाजकंटक टवाळखोरांचा अटकाव होत असल्याने पालकांत घबराटीचे वातावरण पसरत आहे.