धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:32 PM2020-09-15T19:32:01+5:302020-09-15T19:33:39+5:30
प्रशासन, आरोग्य विभागाचे अपयश उघड झाल्याने सर्वत्र संताप
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयातील खाटा संपल्या आहेत. आता एक खाट मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट पहावी लागत आहे. रविवारी रात्री असाच प्रकार निदर्शनास आला. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आता सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. एका खाटासाठी आता रुग्ण व नातेवाईकांना धडपड करावी लागत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ३५० खाटा पूर्णपणे भरल्या आहेत. २० खाटांची रविवारी दुपारी सुरू केलेली फिवर क्लिनीक ओपीडीही अवघ्या दोन तासात हाऊसफुल्ल झाली. त्यामुळे रात्री सहा वाजेच्या सुरारास एका खाटासाठी संशयित रुग्णांची गर्दी जमली होती. याच दरम्यान, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या संशयिताला तो खाट देण्यात आला. इतर रुग्णांना मात्र, खाट मिळविण्यासाठी रात्रभर धडपड करावी लागली.
आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला वारंवार संपर्क करून खाटा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली जात होती. परंतु खाटाच नाहीत तर आम्ही काय करणार? असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत होते. त्यामुळे येथील संशयित रुग्ण खाट मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट पहात असल्याचे दिसले. जिल्हा प्रशासनाच्य ढिसाळ नियोजनामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने खाटांची व्यवस्था करण्याची गरज होती. तसे झाले असते तर रुग्णांना वाट पाहण्याची वेळ आली नसती, अशी चर्चा रुग्णालय परिसरात होती.
रुग्णाला त्रास होत असतानाही खाटा मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईक उपस्थित डॉक्टर, परिचारीकांसोबत वाद घालत आहेत. त्यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र, याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वाढती रुग्णसंख्या पाहता आगोदरच नियोजन केले असते तर वादाचे प्रकार उद्भवले नसते, अशी चर्चा केली जात आहे.
खाजगीत उपचार करण्यास नकार
ताप, सर्दी, खोकला असे आजार असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास नकार दिला जात आहे. तर स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात गेल्यावर कोवीड रुग्णालयात पाठविले जाते. परंतु येथे खाटा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. संशयितांवर उपचार करण्यासह त्यांना खाटा पुरविण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने खाटा कमी पडत आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खाजगी रुग्णालये अधिगृहीत केली जात आहेत. रुग्णांचे हाल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड