श्रावण सोमवार - लाखो भाविकांनी घेतलं परळीच्या वैद्यनाथांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:08 PM2019-08-12T17:08:56+5:302019-08-12T17:13:33+5:30
श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली
बीड/परळी - "हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय"चा मोठा जयघोष करीत हजारो भाविकांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारपर्यंत एक लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने पहिल्या श्रावण सोमवार पेक्षा भाविकांची गर्दी दुप्पट होती, वैद्यनाथास आज शिवमूठ तीळ महिलांनी वाहिले तर पुरुष भक्तांनी बेलपत्र वाहिले.
श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली, मंदिरात महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग होती. तसेच पास धारकांसाठी ही स्वतंत्र रांग लावण्यात आलेली आहे, वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स मधून धर्मदर्शनची सुविधा करण्यात आली आहे. हर हर महादेव चा जयघोष केला जात होता, दुपारी आमदार विनायक मेटे यांनी दर्शन घेतले, वैद्यनाथ मंदिराच्या रोडवर विविध महिला बचत गटाचे स्टॉल उभारण्यात आलेले आहे. पेढे, प्रसाद साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबाजोगाईच्या अप्परजिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, परळी चे पोलीस निरीक्षक देविदास शेळके, बाळासाहेब पवार, महिला पोलीस अधिकारी अनुसया माने, सुरेखा धस यांच्यासह इतर पोलीस तैनात होते.