लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शेतकरी, शेतमजुरांच्या व सर्वसामान्यांच्या मुला-मुलींचे लग्न विनाखर्च व्हावे, या उद्देशाने बीड जिल्हा धर्मदाय संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह समितीच्या वतीने मंगळवारी परळीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ३८ वधू-वर विवाहबध्द झाले.
मुस्लिम समाजातील ५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सकाळी शहरातील इमदादूल उलूम शाळेसमोरील प्रांगणात थाटात झाला. तर सायंकाळी वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याजवळ ३३ जणांचे विवाह लावण्यात आले. यामध्ये १६ बौध्दधर्मीय पध्दतीने तर १६ हिंदू धर्म पध्दतीने व एक लिंगायत पध्दतीने वधू-वरांचा विवाह लावण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत भैय्यू महाराज, अंबाजोगाई मठाचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, सोनपेठ मठाचे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून राज्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू झाली. हुंडा व लग्न कार्यात होणारा खर्च हा सर्व सामान्य शेतकरी, शेत मजुरांना पडवणारा नाही. सर्वसामान्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, या हेतूने मंदिर व वाद नसलेल्या संस्थेच्या मदतीने हा सोहळा झाला.
सकाळी इमदादूल शाळेजवळ मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळ्यात महेबुबिया शिक्षण संस्था, शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्था, सहुलत सहकारी पतसंस्था, हमदर्द सेवाभावी संस्था, अंजुमन संस्थानच्या वतीने पदाधिकाºयांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख व खा. डॉ. प्रीतम मुंडे, प्रा.टी.पी.मुंडे, उषा किरण गित्ते, प्रा बाबासाहेब देशमुख, अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, पिंटू मुंडे, डॉ. संतोष मुंडे, सुरेश फड, किशोर केंद्रे, बाजीराव धर्माधिकारी, पी.एस. घाडगे, दत्ताप्पा ईटके, धम्मानंद मुंडे, राजा पांडे, वैजनाथ विभुते, अनिल तांदळे, जुगलकिशोर लोहिया, विजयकुमार मनेकुदळे, डॉ.सूर्यकांत मुंडे, ताजोद्दीन पठाण, बाबू नंबरदार, राजाखान पठाण, धर्मादाय उपायुक्त के.आर. सुपाते-जाधव, स. धर्मादाय आयुक्त काशीनाथ कामगौडा, समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के, सचिव विजयराज बंब, सहसचिव अंकुश काळदाते, श्रीराम देशपांडे, भाऊसाहेब लटपटे, अॅड. संतोष पवार, सुहास पाटील, प्रा. संतुक देशमुख, प्रदीप खाडे, जरीना देशमुख, सय्यद बहादूर उपस्थित होते.
वधू-वरांना संयोजन समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्य, मणी मंगळसूत्र, कपड्यांचा आहेर देण्यात आला. यशस्वीतेसाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, योगेश्वरी देवस्थान ट्रस्ट, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बीड, श्री शनिमंदिर देवस्थान, जगदंबा देवी संस्थान, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, श्री क्षेत्र गहिनीनाथगड संस्थान, पिंपळेश्वर देवस्थान, नवविकास शिक्षण संस्था, आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, नाथ प्रतिष्ठानने सहकार्य केले.
सद्भावनेचे हात ७६ कुटुंबांना ठरले आधारप्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून वधू-वरांना कपडे देण्यात आले. त्यात वधुंसाठी साडी चोळी व वरांसाठी पोशाखाचा समावेश होता. उषा किरण गित्ते यांच्या वतीने मणी-मंगळसूत्र, चाँदपत्र देण्यात आले.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वतीने वधू-वरांसाठी कपाट, दोन साड्या व अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेच्या वतीने पलंग व गादी देण्यात आली.परळी येथील श्री वैजनाथ ट्रस्टने या सामुदायिक विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च केला गेला.परळी व बीड येथील विवाह सोहळ्यासाठी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने १० लाख रूपयाची देणगी दिली आहे.जिल्ह्यातील विविध संस्थांनी मदत केली आहे. दुसºया टप्प्यात बीड येथे १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यातआला आहे.