‘शुभकल्याण’चा आपेट जेरबंद, १०० कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 06:18 AM2018-08-26T06:18:16+5:302018-08-26T06:18:46+5:30
बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
बीड : अधिक व्याजदराचे आमिष दाखवून मराठवाड्यात ठेवीदारांची तब्बल १०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास शनिवारी पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे अटक केली.
शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक तसेच कर्मचाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रु पयांची फसवणूक झाली आहे. परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि औरंगाबादही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. प्रकरणातील एक आरोपी शिवाजी भानुदास गिरी याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी कळंब येथे अटक केली होती. गिरी याची चौकशी केल्यानंतर पुणे येथे स्वारगेट येथील न्यायालयीन कामाच्या निमित्ताने आपेट येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता आपेट येताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात नेले. तेथे अटकेची कारवाई करून ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेले. शनिवारी त्यास बीड येथे आणण्यात आले. बीड न्यायालयाने त्यास २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सर्व कुटुंबीय फरार
दिलीप आपेट हा २९ जानेवारी १०१८ पासून फरार होता. त्याची पत्नी शालिनी, मुले अभिजीत, अजय आणि विजयसह काही नातेवाईकांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ते सर्व फरार आहेत.