अंबाजोगाईत जन्मली मत्सपरी; मात्र अवघ्या १५ मिनीटांचेच लाभले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 07:27 PM2018-05-21T19:27:50+5:302018-05-21T19:27:50+5:30
अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात आज (२१ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका महिलेने केवळ एकच पाय असलेल्या बाळाला जन्म दिला.
अंबाजोगाई (बीड ) : अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात आज (२१ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका महिलेने केवळ एकच पाय असलेल्या बाळाला जन्म दिला. या बाळाला वैद्यकीय परिभाषेत सीरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणतात. मात्र, या बाळाला अवघे १५ मिनिटांचेच आयुष्य लाभले.
याबाबतची अधिक माहिती देतांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, पट्टीवडगाव येथील एका महिलेस रविवारी (दि.२०) रात्री प्रसुती विभागात दाखल करण्यात आले. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिने एका बाळाला जन्म दिला. या बाळास दोन पायाऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेले शरीर आढळून आले. प्रसूती नंतर मातेची प्रकृती स्थिर होती मात्र बाळाची प्रकृती जन्मतःच चिंताजनक होती. यातच अवघ्या १५ मिनीटात या बाळाचा मृत्यू झाला. यावेळी प्रसुती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डॉ. प्रियंका खराणे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पुनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी माता व बाळावर उपचार केले.
या बाबत डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले कि, या अवस्थेत जन्मलेल्या बाळाला सीरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणतात. एक लाखात एक बाळ जन्माला येण्याची शक्यता असते असेही त्यांनी सांगितले.