अंबाजोगाईत चोरट्यांचा धुडगूस; दोन दिवसांत दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:37 AM2019-07-06T00:37:41+5:302019-07-06T00:38:16+5:30
शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे.
अंबाजोगाई : शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. माळी नगरातील चोरीत तर अवघे तासभर घर बंद असतानाही चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला.
पूस येथील शेतकरी उद्धव नागोराव उपाडे हे अंबाजोगाई शहरातील माळीनगर भागात लोचना आडसुळे यांच्याकडे किरायाने राहतात. गुरूवारी सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर १० वाजता उद्धव हे मित्राकडे कामानिमित्त गेले. साडेबारा वाजता त्यांची पत्नी संगीता या मुलांच्या फिस भरण्यासाठी घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. ही संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी हँडबॅगमधील १ लाख २८ हजार रुपए आणि कपाटातील सोन्याचे गंठन, झुंबर, बाळी, अंगठी, चांदीचे कडे आदी १ लाखांचे दागिने असा एकूण २ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. दुपारी १.२५ वाजता संगीता शाळेतून परतल्या असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पतीला बोलावून घेतले आणि आत जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. याप्रकरणी उद्धव उपाडे यांच्या फियार्दीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुचिता शिंगाडे करत आहेत.
दुसरी चोरी छत्रपती नगरात झाली. येथील मोबाईल दुकान चालक युवराज उद्धवराव देशमुख यांच्या वडिलांना १ जुलै रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे वडिलांच्या उपचारासाठी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून सोलापूरला गेले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी युवराज यांची मावशीने घरात जाऊन कपडे घेतले आणि नंतर कुलूप लावून त्या निघून गेल्या. चोरट्यांनी गुरुवार सायंकाळनंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूमच्या कपाटातून सोन्याच्या अंगठ्या, सहा मोबाईल, चांदीचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सोलापूरला गेलेल्या युवराज यांना शुक्रवारी आधार काडार्ची गरज भासू लागल्याने त्यांनी त्यांच्या मावशीला घराकडे पाठविले असता चोरीची घटना उघड झाली. त्यांनतर युवराज देशमुख यांनी तातडीने अंबाजोगाईला येत शहर पोलिसात तक्रार दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत.