अंबाजोगाईसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:53 PM2018-04-16T17:53:09+5:302018-04-16T17:53:09+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.
अंबाजोगाई : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. राजकिशोर मोदी यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. यामुळे कचरामुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाईची वाटचाल सुरु झाली आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राच्याच धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे यास प्राधान्य आहे. यामध्ये समाविष्ट करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास अंबाजोगाई येथे मान्यता मिळावी यासाठी नगर पालिकेने प्रस्ताव पाठविला होता. यासाठी नगराध्यक्षा रचना मोदी यांच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या पाठपुराव्यास यश येऊन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.९ एप्रिल रोजी शासनाने तसे परिपत्रक काढले आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत आजवर राज्यस्तरीय आणि विभागीय पातळीवर प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिके सातत्याने पटकाविली आहेत. यामुळे देखील अंबाजोगाईच्या प्रकल्प मागणीचा विचार प्राधान्याने करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाईसाठीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने या प्रकल्पांचे मूल्यांकन केल्यानंतर शासनाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च केंद्र सरकार तर निम्मा खर्च राज्य सरकार करणार आहे. प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी राज्य शासनाचे आणि साथ देणारे सर्व नगर परिषद सदस्य, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वागत केले.
४.९८ कोटींचा निधी
कचरा मुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई शहाची वाटचाल सुरू आहे. त्या दृष्टीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा करुन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किंमतीच्या या प्रकल्पास मंजुरी मिळाली.९ एप्रिल रोजी शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.