खरबुज लगडताच कोरोनाचा फटका, पाच रुपये किलोचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:21+5:302021-03-15T04:29:21+5:30
सखाराम शिंदे गेवराई : उन्हाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने खरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील धोंडराई ...
सखाराम शिंदे
गेवराई : उन्हाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने खरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील धोंडराई येथील शेतकऱ्याने दोन लाख रुपये खर्च करून जानेवारी महिन्यात आपल्या पाच एकर जमिनीत खरबुजाची लागवड केली. ते काढणीला आले असता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद आणि मागणी घटल्याने पाच रुपये किलोचा भाव मिळत आहे.
तालुक्यातील धोंडराई येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पाच एकर शेतात जानेवारीमध्ये खरबुजाची लागवड केली. मलचिंग, रोपे, खते, मशागत असा तब्बल दोन लाखांचा खर्च करून खरबुजाची जोपासना केली. मात्र, आता खरबूज मोठ्या प्रमाणात लगडले व काढणी सुरू झाली असताना कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार बंदचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. परिणामी खरबुजाला मागणी कमी झाली आहे. ठोक बाजारात चार ते पाच रुपये किलो कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्च निघणे मुश्किल झाले आहे. शिंदे यांनी गतवर्षी डाळिंबाची लागवड केली होती. त्यावेळीही कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. डाळिंब कवडीमोल भावाने विकावे लागले. झालेला खर्च निघाला नव्हता. यंदा तरी चांगले उत्पन्न काढता येईल, अशी आशा होती. ती फोल ठरत असल्याचे शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी लोकमतला सांगितले.
===Photopath===
140321\14bed_6_14032021_14.jpg~140321\14bed_5_14032021_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील शेतकऱ्याने दोन लाख रूपये खर्चुन खरबुजांची लागवड केली, मात्र बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे.