मराठवाड्यात पावसाचा दगा; पेरणीनंतर सोयाबीनवर पंधरा दिवसांतच नांगर फिरविण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:11 PM2019-08-20T12:11:19+5:302019-08-20T14:56:42+5:30
१०० हेक्टरवरील सोयाबीनचे पीक मोडले
- चंद्रकांत उगले
पाटोदा म. (जि. बीड) : अगोदरच उशिरा बरसलेल्या पावसामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यान मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मात्र, नंतर पावसाने दगा दिला, पिके जळू लागल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत नांगर फिरविण्याची वेळ अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा म. महसूल मंडळातील १५ गावांतील शेतकऱ्यांवर आली आहे.
जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे व पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरणीपासून आजपर्यंत कसलाही पाऊस न पडल्यामुळे सोयाबीनचे पीक वाळून गेले. त्यामुळे पाटोदा, ममदापुर, देवळा, धानोरा बु. धानोरा खु. अंजनपूर, अकोला, मुडेगाव, राडी, सुगाव, नांदडी, कुंबेफळ, माकेगाव, हिवरा खु. सो. बोरगाव या गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक मोडण्यास सुरवात केली आहे. या मंडळातील शेतकऱ्यांनी गतवर्षी पावसाअभावी रबीत हरभरा पिकाचीही पेरणी केली नव्हती. आता सोयाबीन पीक मोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे होते नव्हते तेवढे पैसे संपल्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, बँकेचे कर्ज कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. शेतकरी सुभास डिरंगे म्हणाले, १९७२ नंतर ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी जनांवरासाठी चारा होता, परंतू माणसांना खायला अन्न नव्हते. यंदा मी स्वत: २५ एकर सोयाबीन पेरली होती, त्यापैकी २० एकरातले पीक मोडले. शेतकरी बालासाहेब उगले म्हणाले, मला जसे कळते तसे याआधी असे कधीही झाले नव्हते. मी यावर्षी ३० एकर सोयाबीन पेरले होते त्यापैकी २२ एकरातील सोयाबीन मोडले आहे. दोन दिवसांत पाऊस न पडल्यास उर्वरित पीकही मोडावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना कडबा मिळेना
जनावरांना संभाळण्यासाठी चारा नाही. ज्वारीचा कडबा ५ हजार रुपये शेकडा भाव देऊनही मिळेना, काही शेतकरी पंढरपूरहून साडेचार हजार रुपये टन दराने ऊस खरेदी करून पशुधन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ऐपत नसल्यामुळे बाजारात विक्री करीत आहेत, तर काहींनी जनावरे मोकळे सोडून देण्याचे धोरण अवलंबिले आहे.
रबी पेरणीची वेळ जवळ आली
पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून रबी पेरणीची वेळ जवळ आल्यामुळे शेतकरी सोयाबीन पीक मोडत आहेत. उद्या महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे करणार आहेत.
- ए. जी. गाडे, कृषी सहायक, पाटोदा (ता. अंबाजोगाई)