बीड : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा प्रवास समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे. केवळ पैशांची बचत आणि वेळेच्या बंधनामुळेच प्रवासी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते; परंतु हे प्रवासी एसटीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्याचे आव्हान राज्य परिवहन महामंडळाला असणार आहे.
जिल्ह्यात आठ आगार आहेत. जवळपास ६०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी रापमकडे आहेत. यात शिवशाही व इतर बसचा समावेश आहे. असे असले तरी मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे लालपरी तोट्यात धावत आहे. अद्यापही पूर्णक्षमतेने आणि १०० टक्के बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद मिळत असल्याने रापम तोट्यात आहे. तसेच वेळेवर सुटणाऱ्या बस मागे पुढे सोडाव्या लागतात. तर काही वेळा फेऱ्याही रद्द झालेल्या आहेत. याच कारणांमुळे सध्या रापमकडे प्रवासी कमी प्रमाणात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला कमी पैशांचे आमिष दाखवून प्रवाशांना क्षमतेपेक्षा जास्त बसून खाजगी ट्रॅव्हल्स सुसाट धावत आहेत. त्यामुळेच छोटे-मोठे अपघात होण्यासह छेडछाड व चोरीसारख्या घटना घडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरक्षित प्रवासासाठी रापमच्या बसनेच प्रवास करावा, असे आवाहन केले जात असले तरी अद्याप प्रवाशांकडून याला प्रतिसाद मिळालेला नाही.
का आहे सुरक्षित प्रवास?
रापमच्या बसचा दुर्दैवाने अपघात झाला तर तात्काळ तिकिटावरच विमा देण्याची प्रक्रिया रापमकडून केली जाते. तसेच एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला १० लाखांपर्यंत मदत केली जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांसाठीही मदत केली जाते. खाजगी ट्रॅव्हल्समध्ये मात्र काहीच मिळत नाही. तसेच सरकारी बसमध्ये छेडछाडीच्या घटनांना आळा बसतो. कारण स्थानकांमध्ये पोलीस व सुरक्षा रक्षक असतात.
एसटीला स्पीड लॉक, टॅव्हल्स सुसाट
रापमच्या बसला स्पीड लॉक असते. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी असते. तर दुसऱ्या बाजूला खाजगी ट्रॅव्हल्स वायुवेगाने सुसाट धावतात. त्यामुळे त्यांचे अपघात होतात. याची नाेंदही कोणाकडे ठेवली जात नाही.
---
बसचा प्रवास खाजगीपेक्षा खूप जास्त सुरक्षितच आहे. अपघात, छेडछाड, चोरी या घटना अपवादात्मक घडतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्ण काळजी घेतली जाते. तसेच दुर्दैवाने अपघात झालेल्यांनाही मदत केली जाते. प्रवाशांनी मानसिक बदलून बसनेच प्रवास करावा.
-अजय मोरे, विभाग नियंत्रक, रापम, बीड
---
एसटीचे झालेले अपघात
२०१६-१७ ९७
२०१७-१८ ९२
२०१८-१९ १००
२०१९-२० ७४
२०२० -२१ ३४