केजनंतर बीडमध्ये बलभीम महाविद्यालयाबाहेर दोन गटांत दगडफेक; दोघे ताब्यात
By सोमनाथ खताळ | Published: March 27, 2023 06:49 PM2023-03-27T18:49:13+5:302023-03-27T18:53:18+5:30
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी दुपारी बलभीम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये किरकाेळ कारणावरून वाद झाला.
बीड : केजमधील दगडफेकीचे प्रकरण शांत होत नाही तोच आता बीड शहरातील बलभीम महाविद्यालयाच्या बाहेर दोन गटात दगडफेक झाली. यात दोघेजण पोलिसांनी ताब्यातही घेतले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्येही झालेल्या किरकाेळ कारणावरूनही हा वाद झाल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी दुपारी बलभीम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये किरकाेळ कारणावरून वाद झाला. थोडावेळाने हा वाद मोठा झाला. दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना बोलावून घेत एकमेकांवर दगड फेकायला सुरूवात केली. यामुळे इतर विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. यात काही मुलीही होत्या. तसेच काही दगड या भागातल रहिवाशांच्या घरावरही गेल्याचे सांगण्यात आले. तर काहींनी याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हा वाद निवळला. परंतू या भागात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दोन तरूणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले असून त्यांची चौकशी करून इतर मुलांची नावे निष्पन्न केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अफवांना बळी पडू नये
दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याचे खरे आहे. याचे कारण शोधणे सुरू आहे. तसेच कोणीही अफवा पसरवू नये आणि नागरिकांनीही या अफवांना बळी पडू नये. दगडफेक करणाऱ्यांचा शोध आम्ही घेत आहोत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ.
- सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड