लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील भवानवाडी येथे झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासकीय कार्यालयांमध्ये केल्याच्या कारणावरुन अमोल शिंदे नामक तरुणाला भवानवाडी येथील १० ते १५ जणांनी मारहाण केली. शहरातील शिवाजीनगर परिसरातील राष्ट्रवादी भवनाजवळ मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गावातील सरपंच पतीसह इतर पंधरा जणांनी मारहाण केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा नोंदविण्याची प्रकिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.तालुक्यातील भवानवाडी या गावात रस्ता, शौचालय इतर कामे झाली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी संबंधित विभागाकडे अमोल शिवाजी शिंदे यांनी तक्र ारी केल्या होत्या. रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच शौचालय बांधकाम योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारी केल्यामुळे सरपंच पती हनुमंत जगताप यांने राग धरुन मारहाण केल्याची माहिती येथील दुकानदार भोसले यांनी दिली.शिवाजीनगर परिसरातील राष्ट्रवादी भवनाजवळ कपील भोसले यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी तेथे अतुल शिंदे कपील भोसले, जिंतेद्र भोसले, अतुल भोसले हे बोलत बसले होते. त्याच वेळी अचानक रिक्षा व मोटारसायकलवरुन आलेल्या १० ते १५ जणांनी त्यांच्याकडे असलेल्या दांडक्याने अमोल शिंदे यांना अचानक मारहाण सुरु केली. त्यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या कपील, जितेंद्र, अतुल भोसले यांना देखील मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये अमोल शिंदे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. आरडाओरड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली होती. या भांडणाची माहिती समजल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून मारहाण करणारे सर्वजण मोटरसायकल व रिक्षामधून पसार झाले. जखमी अमोल शिंदे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आाले. तसेच कपील, जितेंद्र, अतुल भोसले यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.भवानवाडी पिंपळनेर पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्यामुळे, शिवाजीनगर येथे मारहाण करणाºयांची नावे लिहून घेतली व त्यांना पकडण्यासाठी पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या मारहाण प्रकरणी सरपंचपती हनुमान जगताप, हरीदास जगताप, बिभिषण जगताप, काशीनाथ जगताप, अमोल जगताप, प्रताप जगताप, अशोक जगताप, गणेश नवनाथ जगताप, गणेश दामोदर जगताप सर्व रा. भवानवाडी यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गैरव्यवहाराची तक्रार दिल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:22 AM
तालुक्यातील भवानवाडी येथे झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासकीय कार्यालयांमध्ये केल्याच्या कारणावरुन अमोल शिंदे नामक तरुणाला भवानवाडी येथील १० ते १५ जणांनी मारहाण केली.
ठळक मुद्देभवानवाडीच्या तरुणावर दुचाकीवरुन आलेल्यांनी केला हल्ला