महसूल विभागात खळबळ ; ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:45 PM2021-02-18T22:45:47+5:302021-02-18T22:46:19+5:30
गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरळीत ठेवण्यासाठी केली होती लाचेची मागणी
माजलगाव : वाळूची वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी ६५ हजार रुपयांची लाच चालकामार्फत घेताना येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी रात्री ९ वाजता रंगेहाथ पकडले.
माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचा अवैध रित्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम काही स्वरूपात अधिकारी हे करत असतात. माजलगाव तालुक्यालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरु होते. दोन्ही भागातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा होतो. हा अवैध उपसा विना अडथळा व्होऊ द्यावा यासाठी वाळूमाफिया अधिकाऱ्यांना लाच देऊन आपले उखळ पांढरे करतात. यातूनच त्याचाच वाळूचा अवैधरित्या उपसा होऊ द्यावा म्हणून वाळू माफियांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना सुमारे ६५ हजाराची लाच देऊ केली. ही लाच चालकामार्फत शहरातील संभाजी चौकात घेत असताना त्यांना गुरुवारी रात्री ९ वाजता पकडण्यात आले. सदरील कारवाई जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी निकाळजे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व त्यांचा चालक यांना पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे नेण्यात आले आहे.