प्रशासन सांभाळून यशस्वी केल्या ३५७७ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:46 AM2019-09-18T00:46:49+5:302019-09-18T00:47:19+5:30
केवळ प्रशासन सांभाळणेच नव्हे तर कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावणे आणि स्वता: पुढे होऊन शस्त्रक्रिया करण्यात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आघाडीवर राहिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : केवळ प्रशासन सांभाळणेच नव्हे तर कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावणे आणि स्वता: पुढे होऊन शस्त्रक्रिया करण्यात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आघाडीवर राहिले आहेत. दोन वर्षात स्वत: पुढे होऊन त्यांनी तब्बल ३ हजार ५७७ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुर्बिनद्वारे बिनटाका कुटूंबकल्याणच्या २९२० शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
डॉ.अशोक थोरात हे आगोदर केज उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ७ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुरूवातीला त्यांच्यावर अनेक आरोप झाले. मात्र, हे आरोप झुगारून त्यांनी कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावण्याबरोबरच प्रशासन गतीमान केले.
तसेच स्वत: पुढे होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालयात जावून शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. ते स्वता: पुढे झाल्याने कामचुकार करणारे डॉक्टरही शस्त्रक्रिया करण्यासह रूग्णांची वेळेवर तपासणी करू लागले.
दरम्यान, ७ आॅगस्ट २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत त्यांनी ३ हजार ५७७ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुर्बिणीद्वारे बिनटाका शस्त्रक्रिया २९२०, टाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ७८, वैद्यकीय गर्भपात २९, सीझर २४३, स्त्रीरोगा संदर्भातील विविध शस्त्रक्रिया १३७, जनरल शस्त्रक्रिया १७० यांचा समावेश आहे. हे सर्व करताना त्यांना भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, परिचारिका व सेवकांची मदत असते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
स्वत: पुढे होऊन काम करण्याबरोबरच लोकसहभागातून तब्बल ८० लाख रूपयांचा निधी जमा केला. या निधीच्या माध्यमातून जिल्हा रूग्णालयात विविधा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मोतिबिंदू, कुटूंबकल्याण, सुरक्षित मातृत्व अभियान आदींमध्ये बीड जिल्हा राज्यात अव्वल आहे. लोकसहभागातून कमी कालावधीत एवढा मोठा निधी जमा करणारे बीड आरोग्य विभाग पहिला आहे.