- अनिल महाजनधारूर : औरंगाबादहून आलेला ३२ वर्षीय व्यक्ती गुरूवारी कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता. शुक्रवारी त्याच्यावर यशस्वीरित्या डायलेसिस करण्यात आले. बीडमध्ये पहिल्यांदाच कोरोनाग्रस्तावर डायलेसिस करण्यात आले आहे. प्रत्येक चार दिवसाला त्याच्यावर डायलेसिस केले जाणार आहे.
धारूर शहरातील दुधिया गल्लीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रत्येक चार दिवसाला डायलेसिस केले जाते. औरंगाबाद येथे तो केवळ डायलेसिससाठी खोली करून राहत होता. २५ मे रोजी तो रितसर परवानगी घेऊन मामे बहिणीसोबत धारूरला आला. येथे नातेवाईकांना भेटला. दुसऱ्या दिवशी रिक्षा करून बीडमध्ये आला. बालेपीर भागात राहणाऱ्या पत्नी व मुलांना घेऊन तो पुन्हा धारूरला गेला. त्यांना सोडून तो डायलेसिस करण्यासाठी पुन्हा बीडला आला. यामुळे त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनेकांशी संपर्क आला. एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने त्याच्या प्रवासाचा इतिहास पाहून जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. बुधवारी स्वॅब घेतल्यावर गुरूवारी त्याचा रिपोर्ट पॉटिव्हि आला. शुक्रवारी त्याच्यावर डायलेसिस करणे आवश्यक होते. डॉ.मनोज मुंडे, परिसेविका स्वाती गव्हाणे, किशोर धुनगाव, बलभीम माने आदींनी त्याच्यावर यशस्वी डायलेसिस केले. बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तावर पहिल्यांदाच डायलेसिस करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
होम क्वारंटाईन असतानाही प्रवासऔरंगाबादहून येतानाच त्याला गढी फाट्यावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. तरीही हा व्यक्ती घरात न राहता नातेवाईकांकडे गेला. बीडलाही प्रवास केला. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आला आहे. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. धारूर शहरात भेट दिल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी सांगितले.