बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 07:39 PM2019-02-25T19:39:21+5:302019-02-25T19:40:26+5:30
वर्षा ही विवाहित असून सासर परभणी आहे. ती सध्या बारावीची परीक्षा देत होती.
बीड : बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून विहिरीच्या कडेला पडलेल्या पर्समध्ये चिठ्ठी सापडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
वर्षा रामनाथ नागरगोजे (१९ रा.नागरगोजे वस्ती, चिंचाळा ता.वडवणी ह.मु.परभणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वर्षा ही विवाहित असून सासर परभणी आहे. तिचे पती पोलीस दलात कार्यरत आहेत. वर्षा सध्या बारावीची परीक्षा देत होती. परभणी येथील शिवाजी विद्यालय हे तिचे परीक्षा केंद्र होते. शनिवारी तिने परीक्षा दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र त्यानंतर ती चिंचाळा येथे कशी आली, याबाबत उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, सोमवारी दुपारी बंडू वाघमोडे हे विहिरीत पाणी किती आहे, हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना वर्षाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. वडवणीचे सपोनि सुरेश खाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी धाव घेतली. पंचनामा करताना त्यांना विहिरीच्या कडेला वर्षाची पर्स मिळून आली. यामध्ये तिचे परीक्षाचे हॉलतिकीट, महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत काय आहे? याची माहितीही मिळू शकली नसली तरी ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात कसलीच नोंद झालेली नव्हती.
नातेवाईकांचा टाहो
वर्षाचे वडील रामनाथ यांचे आजारपणामुळे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. आई, बहिण व भाऊ असा तिचा माहेरचा परिवार आहे. परिस्थिती हालाकिची असल्याने आई मिरा नागरगोजे या बीडमधील एका खाजगी रूग्णालयात काम करीत होत्या. यावरच त्यांचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागायचा. वडिलांचे निधन झाल्यानंतर मिरा यांनी परिस्थितीचा सामना केला. मुलांवर त्यांचा जीव होता. आता पोटच्या मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर इतर नातेवाईकांनीही धाव घेत आक्रोश केला. यामुळे परिसर सुन्न झाला.