सुमित वाघमारे खून प्रकरण; साक्षीदार भाग्यश्रीला धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:07 AM2019-07-09T00:07:07+5:302019-07-09T00:07:38+5:30
सुमित वाघमारे याची पत्नी तसेच फिर्यादी व साक्षीदार भाग्यश्री ही न्यायालयात तारखेसाठी जात होती, त्यावेळी न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी धमकावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रेमविवाह केला म्हणून बीड शहरातील बार्शी नाका परिसरात १९ डिसेंबर २०१८ रोजी सुमित वाघमारे या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सोमवारी याप्रकरणातील सुमित वाघमारे याची पत्नी तसेच फिर्यादी व साक्षीदार भाग्यश्री ही न्यायालयात तारखेसाठी जात होती, त्यावेळी न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी धमकावले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१९ डिसेंबर २०१८ रोजी सुमित वाघमारे याने प्रेमविवाह केल्यामुळे त्याचा मेहुणा बालाजी लांडगे, त्याचा मित्र संकेत वाघ व खुनाचा कट रचल्याप्रकरणी कृष्णा क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली होती. यातील काहींची जामीनावर सुटका झाली. तर संकेत वाघ याच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी होती. प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व मुख्य साक्षीदार ही सुमितची पत्नी भाग्यश्री आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणीची तारीख असल्यामुळे भाग्यश्री न्यायालयात आली होती. त्यावेळी ‘न्यायालयात तू कशी काय येतेस यापुढे तारखेला यायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली’. यावेळी भाग्यश्रीने तिच्या सोबत असलेल्या अंगरक्षक महिला पोलिसांना माहिती दिली. आरोपींचे नातेवाईक मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार करताच अंगरक्षक महिला पोलीस कर्मचाऱ्याने तात्काळ त्या महिलांना बाजूला केले. त्यानंतर भाग्यश्रीने शिवाजीनगर ठाण्यात रेखा लांडगे, स्वाती लांडगे व मोहिनी गायकवाड विरुद्ध तक्रार दाखल केली