सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी विधानसभा मतदार संघातील भाजपांतर्गतचा कलह पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी भविष्यात निश्चितच डोकेदुखी ठरणार, हे राजकीय घडामोडी पाहता लक्षात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खेळ खेळला जात असला तरी त्याचा फटका लोकसभा निवडणुकीतही बसू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धस विजयी झाल्यानंतर आष्टी विधानसभा मतदार संघातील राजकारण बदलत आहे. आपल्या रांगड्या स्वभावाप्रमाणे धसांचे मतदार संघातील वागणेही भाजपचे विद्यमान आ. भीमराव धोंडे यांच्यासाठी देखील तसे त्रासदायकच. दोघेही या मतदार संघातील एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी परंतु, आता एकाच पक्षात असल्यामुळे दोघांचेही वागणे पक्षशिस्तीत निश्चितच बसणारे नाही. मध्यंतरी रस्त्याच्या मंजुरीचे श्रेय घेण्यावरून आ. धस आणि आ. धोंडे यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक भाजपाच्या पक्षशिस्तीत बसणारी नव्हती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आखाड्यात उतरलेल्या पहेलवानासारखी खुन्नस त्यांच्या जाहीर वक्तव्यातून दिसत आहे. या दोघांतील वाद निवळत नाही तोच शुक्रवारी ‘तालीम’ जमीनदोस्त करण्याचे प्रकरण उद्भवले. आपल्या तत्कालीन कार्यकाळात या दोन्ही आमदारांनी आष्टीतील जय हनुमान तालीमला निधी दिला होता. सुरेश धसांचे कट्टर विरोधक सतीश शिंदे यांच्या ह्या एकमेकास लागून असलेल्या दोन्हीही तालीम शुक्रवारी भल्या पहाटे बुलडोझर चालवून जमीनदोस्त केल्या. ह्या तालीम धसांनी स्वत: उभे ठाकून जमीनदोस्त केल्या, जाब विचारला तर मला जिवे मारण्याची धमकी दिली, असा तक्रारी अर्ज देत सतीश शिंदे हे शुक्रवारपासूनच आष्टी तहसीलसमोर उपोषणास बसले आहेत. शिंदे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे आष्टी तालुकाध्यक्ष आहेत. जि.प. निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राजकीय द्वेषातून धसांनी ही तालीम जमीनदोस्त केली, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. जि.प. निवडणुकीवेळी धस हे राष्टÑवादीत, तर सतीश शिंदे हे भाजपात होते. आता दोघेही भाजपमध्येच असल्यामुळे जुन्या आठवणी या पक्षांतर्गत वादाचे मूळ ठरत आहेत. हा वाद धोंडे यांच्या पथ्यावर पडला आहे. सतीश शिंदे यांनी मतदार संघातील पाटोदा आणि आष्टी तालुक्यात संपर्क अभियान सुरू केले आहे. त्यांचे हे संपर्क अभियान भविष्यात धसांनाच अडचणीचे ठरणारे होते, हे ही या वादाचे कारण असू शकते. या मतदार संघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आ. साहेबराव दरेकर यांनी मध्यंतरी धोंडे-धस यांच्यातील वादात जाहीरपणे हस्तक्षेप करून पक्षहितासाठी दोघांनीही तोंड गप्प ठेवावे, असा वडीलकीचा सल्ला दिला होता. असे असतानाच हे तालीम प्रकरण उद्भवले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर असे अंतर्गत कलह कुठल्याही पक्षासाठी हिताचे नसते, परंतु, बीड जिल्ह्यात मात्र अशा कलहातूनच पक्षातील स्वत:चे अस्तित्व मजबूत करण्याचा नवीन पायंडा पडत आहे. आष्टीतील या भाजपातील अंतर्गत कलहाची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात त्यांचीही डोकेदुखी वाढू शकते, हे ही तितकेच खरे.
सुरेश धस-सतीश शिंदेंतील कलह भीमराव धोंडेंच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:29 AM