तलाठ्याची नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाला २ लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:07 AM2019-06-14T00:07:23+5:302019-06-14T00:08:21+5:30
माझ्या मंत्रालयात ओळखी असून त्याआधारे तुम्हाला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करत रायगड जिल्ह्यातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आष्टीच्या तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
बीड : माझ्या मंत्रालयात ओळखी असून त्याआधारे तुम्हाला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करत रायगड जिल्ह्यातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आष्टीच्या तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर व्यक्तीवर आष्टी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील मुर्शदपुर येथील अभिषेक भास्करराव हंबर्डे हा तरुण एम.बी.ए (फायनान्स) पदवीधारक आहे. उच्चशिक्षित असूनही तो बेरोजगार होता. त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, तीन वर्षापूर्वी तो पुणे येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चा संदर्भात पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला उपस्थित राहिला.
या बैठकीत धामणगांव येथील अजिनाथ लोखंडे यांनी अभिषेकची ओळख रायगड येथील छावा मराठा योध्दा संघटना, महाराष्ट्र या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मुद्दसीर अहमद पटेल (रा. वहुर, ता. महाड, जि. रायगड) याच्यासोबत ओळख करून दिली.
मुदस्सीर पटेलने अभिषेकला विश्वासात घेत आपली मंत्रालयात ओळख असून त्या माध्यमातून तुला तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यासाठी सात लाख रुपये द्यावे लागतील अशी अटही पटेलने घातली.
मुलाच्या नोकरीच्या आशेने अभिषेकचे वडील पैसे देण्यास तयार झाले. दोन लाख नोकरी लागण्यापूर्वी आणि पाच लाख नोकरीची आॅर्डर हातात पडल्यानंतर द्यायचे ठरले. त्यानुसार अभिषेकच्या वडिलांनी २७ जून ते २० नोव्हेंबर या कालावधीत तीन टप्प्यात मुदस्सीर पटेलला एकूण दोन लाखांची रक्कम सुपूर्द केली. त्यानंतर २-३ महिन्यानंतर अभिषेकने नोकरीबाबत मुदस्सीरकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
पाच-सहा महिन्यानंतर तलाठी पदाच्या जागा निघणार आहेत असे सांगत दोन वर्षे त्याने अभिषेकला झुलवत ठेवले. नोकरी मिळत नाही याचा अंदाज आल्यानंतर अभिषेकने दिलेली रक्कम वापस मागितली असता मुदस्सीर पटेल याने कशाचे पैसे असे म्हणत हात वर केले आणि पैसे मागितले तर आष्टीत येऊन जीवे मारीन अशी धमकी अभिषेकला दिली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्याने अखेर अभिषेकने आष्टी पोलिसात धाव घेतली. अभिषेकच्या तक्रारीवरून मुदस्सीर पटेलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.