कारागृहात घुमला टाळ, मृदंगाचा गजर; बीडमध्ये युवकांच्या पुढाकाराने कीर्तन महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:21 PM2018-08-29T15:21:54+5:302018-08-29T15:26:08+5:30
कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हा कारागृहात पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव घेतला जात आहे.
बीड : कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हा कारागृहात पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव घेतला जात आहे. आज दुपारी या महोत्सवास सुरूवात झाली. यावेळी टाळ, मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. तर कैद्यांच्या तोंडी विठ्ठल नामाचा गजर होता.
प्रा.नाना कदम व सुरेश जाधव या दोन युवकांच्या पुढाकारातून जिल्हा कारागृहात कीर्तन महोत्सव घेतला जात आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता या महोत्सवास सुरूवात झाली. यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, कारागृह अधीक्षक महादेव पवार, कारागृह निरीक्षक कांबळे, प्रा.नाना महाराज कदम, अभिमान महाराज ढाकणे, गणेश महाराज भांडे, गोरख महाराज वायभट, सचिन महाराज थापडे, प्रा.संभाजी जाधव, बाळू शिंदे, प्रकाश जाधव, दत्ता गव्हाने, ज्ञानोबा वायबसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कारागृहात कैद्यांसाठी नेहमीच वेगवेगळे मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. त्यांचे मनपरिवर्तन करणे, हा या मागचा उद्देश असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारागृहातच सप्ताहाचे आयोजन सुरेश जाधव व प्रा.नाना कदम यांनी केले. आतापर्यंत कारागृहात असा कार्यक्रम कोणीही अयोजित केला नसल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी सुरेश महाराज जाधव यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. एकदा केलेली चुक पुन्हा करू नका. एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करण्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी टाळकरी, कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.