- भारत दाढेल
अंबाजोगाई (बीड) : ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून सादर करणार्या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली.
साहित्य संमेलनात यंदा प्रथमच साहित्यिक शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले. या संधीचे सोने करीत शिक्षक साहित्यिकांनी कथाविष्कार सिद्ध केला. पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात वि.भा. सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. ग्रामीण भागातील शाळा मास्तराचे भावविश्व विनोदी शैलीत व्यक्त करणार्या गेवराई येथील मधुकर बैरागी यांच्या ‘लगीन’ या कथेने कथाकथनास प्रारंभ झाला. ठेंगणी शरीरयष्टी असलेल्या मास्तराच्या स्वनिवेदनाने कथाकथनात चांगलीच रंगत भरली.
शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागात गुड मॉर्निंग पथकाची मोहीम राबविण्यात येत आहे. हा धागा पकडून पाटोदा येथील परशुराम सोंडगे यांनी ‘गुड मॉर्निंग’ ही कथा सादर केली. हगणदारीमुक्तीचा कसा फज्जा उडतो आणि शौचालय बांधणे किती गरजेचे आहे, हा संदेश त्यांनी कथेतून दिला.
अंबाजोगाई येथील गोरख शेंद्रे यांनी पुरात अडकलेल्या लहान मुलीला संप्या हा धाडसी मुलगा जिवावर उदार होऊन कसा वाचवितो, हे सांगून रसिकांना खिळवून ठेवले. कविता पांडे यांनीही ‘सुतक’ या कथेतून कौटुंबिक भावनांचा आविष्कार सादर केला. कुटुंबात असणार्या सदस्यांच्या विविध मनोवृत्तीचे दर्शन त्यांनी कथेतून घडविले. त्यानंतर रामदीप डाके यांनी ‘डबल सीट’, तर केज येथील भागवत सोनवणे यांनी ‘डॉक्टर’ ही कथा सादर केली. सूत्रसंचालन ईश्वर मुंडे यांनी केले, तर बाबासाहेब हिरवे यांनी आभार मानले.