उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तहसीलदारांचा 'दणका'; विभागांना ठोकले टाळे, बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:48 PM2021-02-22T19:48:48+5:302021-02-22T19:49:25+5:30
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साधारणतः सकाळी पाऊणे दहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असते, मात्र या वेळेत अनेक कर्मचारी अनुपस्थित होते
माजलगाव : माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी तहसील कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी उशिरा येणाऱ्या सात कर्मचाऱ्यांच्या दालनाला ताळे ठोकले. यासोबतच सात जणांना नोटीसा बजावल्या आहेत.
सोमवार हा आठवडयाचा पहिला दिवस असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयातच थांबावे असा नियम आहे. परंतु, येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी कधी पण येतात व कधी पण जातात असे निदर्शनास आले होते. यामुळे नागरिकांचे कामे खोळंबून रहात.या बाबत नागरिकांनी अनेक वेळा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. आज तहसीलदार वैशाली पाटील यांनी या कामचुकारांना धडा शिकविण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता तहसील परिसरात आल्या.
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साधारणतः सकाळी पाऊणे दहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असते, मात्र या वेळेत महसूल विभाग, पुरवठा विभाग, संगणक विभाग, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना विभाग आदी विभागात अधिकारी, कर्मचारी गैरहजर जाणवले. तहसीलदार पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून १० वाजता ज्या-ज्या विभागातील कर्मचारी उशिरा आले, त्या-त्या विभागाला दालनाला टाळे ठोकले. या कारवाईमुळे कामचुकारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. बाहेर गावाहून अप - डाऊन करणा-या सात कर्मचाऱ्यांची तहसीलदार पाटील यांनी गैरहजेरी टाकत कारणे दाखवा नोटीस बजावली. या बाबत तहसीलदार वैशाली पाटील म्हणाला की, अनेक वेळा सांगुन कर्मचारी ऐकत नसतील तर यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.