ठेवीदारांची दहा कोटींची फसवणूक; परिवर्तन मल्टीस्टेटचा फरार मुख्याधिकारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:26 PM2020-09-18T16:26:02+5:302020-09-18T16:27:44+5:30
आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक
बीड : ठेवीदारांना जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून १0 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेतील मुख्याधिकारी किसन नागोराव मिसाळ याला गुरुवारी सकाळी माजलगाव येथील त्याच्या घरातून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यास तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय ऊर्फ भारत अलझेंडे मात्र अद्याप फरार आहे.
माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेने ठेवीदाराना जास्त व्याजदराचे आमीष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमाअंतर्गत बँकेतील संचालक मंडळासह ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून आतापर्यंत १८ आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. यापैकी अनेकांना जामीन मिळाली आहे. १७ आरोपी हे अद्याप फरार आहेत.
मिसाळ हा मागील अनेक दिवसांपासून फरार होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत त्याला माजलगाव येथे अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, पोह.सुरेश सांगळे, पोना.राजू पठाण व चालक अशोक नन्नावरे यांनी केली.
मुख्य आरोपी विजय आलझेंडे फरारच
माजलगाव येथील विजय ऊर्फ भारत आलझेंडे याने माजलगाव शहरात सुरुवातीला परिवर्तन पतसंस्था स्थापन केली. त्यानंतर परिवर्तन मल्टीस्टेट सुरू केली. या पथसंस्थेत संचालक म्हणून अनेक बड्या लोकांना घेण्यात आले होते. बँकेने १0 ते १२ वर्षे आर्थिक व्यवहार चांगला चालवला. त्यानंतर बँकेत तीन वर्षांपासून गळती लागली. दोन वर्षांपूर्वी बँकेचा चेअरमन अलझेंडे हा अचानक फरार झाला. यातील संचालक व अनेक कर्मचाऱ्यांवर त्यानंतर गुन्हे दाखल झाले. या मल्टीस्टेटच्या १२ शाखा होत्या. या बँकेत जवळपास ८ ते १० कोटी रुपयांचा अपहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात अनेक संचालक व कर्मचारी जमानतीवर सुटले. मुख्य आरोपी विजय ऊर्फ भारत अलझेंडे फरार आहे.