गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:20 PM2020-09-15T12:20:56+5:302020-09-15T12:21:31+5:30
येडशी- औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील गढी येथे जय भवानी देवीचे मंदिर आहे.
गेवराई (जि. बीड) : कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. याचा फायदा उचलून गढी येथील जय भवानी मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, कमरपट्टा, गळ्यातील मणिमंगळसूत्र व पितळी उत्सव मूर्ती असा १ लाख ६ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली.
येडशी- औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील गढी येथे जय भवानी देवीचे मंदिर आहे. पहाटे अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे, सपोनि. राजाराम तडवी, उबाळे यांनी पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. दानपेटी फोडण्याचा देखील प्रयत्न चोरट्यांनी केला होता. पुजाऱ्याच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या घटनांत वाढ
बीड जिल्ह्यात चोरी व दरोडे वाढले आहेत. दरम्यान, देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चोरट्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.