परळी परिसरात अकृषी प्रमाणपत्र नसल्यामुळे २००हून अधिक रजिस्ट्री प्रलंबित- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:02+5:302021-02-12T04:31:02+5:30
परळी : तालुक्यातील अकृषी प्रमाणपत्र एन. ए. नसल्यामुळे २००हून अधिक रजिस्ट्री प्रलंबित असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल थकीत ...
परळी : तालुक्यातील अकृषी प्रमाणपत्र एन. ए. नसल्यामुळे २००हून अधिक रजिस्ट्री प्रलंबित असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल थकीत आहे. २०१३पासून परळीतून एन. ए. प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली होती. त्यापूर्वी उपविभागीय कार्यालय, अंबाजोगाई येथून हे प्रमाणपत्र मिळत असे. मात्र, दिनांक २३ एप्रिल २०११ रोजी अभिलेख कक्षाला लागलेल्या आगीत सर्व एन. ए. प्रमाणपत्र जळून नष्ट झाल्यामुळे आपल्याला अभिलेखाची नक्कल देता येत नाही, असे लेखी पत्रकाद्वारे तहसील कार्यालय, अंबाजोगाई यांच्याकडून कळविले जात आहे.
काहीजणांकडे एन. ए.ची मूळ प्रत उपलब्ध आहे परंतु त्याची नक्कल आज तारखेला तहसील कार्यालयात सर्टिफाय करून मिळत नाही. कारण परळी तहसील कार्यालयाकडून संबंधित दस्तावेज गहाळ झाले आहेत. तहसील कार्यालयात आतापर्यंत नोंद झालेल्या एन. ए.पैकी केवळ १० टक्के रेकॉर्ड उपलब्ध आहे. बाकीचे ९० टक्के गहाळ झालेले आहे. या समस्येवर अनेक तक्रारी झाल्यानंतर परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५ फेब्रुवारीला याबाबतची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही बैठक आजपर्यंत झालेली नाही.
तालुक्यातील अकृषी प्रमाणपत्र एन. ए. नसल्यामुळे २००हून अधिक रजिस्ट्री प्रलंबित आहेत. तहसील कार्यालय, अंबाजोगाई येथे लागलेल्या आगीत जळून गेलेले दस्तावेज, परळी तहसील कार्यालयात अंदाजे ९० टक्के गहाळ झालेले रेकॉर्ड आणि बनावट कागदपत्रे ही कारणे यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रलंबित असलेल्या रजिस्ट्रीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल थकीत आहे व गरजू लोकांना जमीन/घर/प्लॉट विक्री करून आपल्या जीवनातील अतिआवश्यक कार्ये जसे की लग्न, दवाखान्याचा खर्च, कर्ज फेडणे असे सर्व व्यवहार खोळंबले आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सिद्धार्थ गवळी, शाम जोशी, मुक्तार काकर आणि लक्ष्मण गित्ते यांनी शासनाकडे केली आहे.
ज्यांच्याकडे एन. ए. नाही, अशांनी रितसर अर्ज करून नव्याने एन. ए. करून घ्यावेत व तसेच जे रेकॉर्ड कार्यालयाकडे उपलब्ध आहे, त्याची सर्टिफाय कॉपी आम्ही लगेच देतो. - एस. डी. इंफाळ, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, परळी
वरिष्ठांच्या आदेशावरून संबंधित कार्यालयातून एन. ए.ची नक्कल अथवा बीड येथील नगररचनाकार यांची सर्टिफाय कॉपी व लागणारे आवश्यक ते कागदपत्रे असल्यास आम्ही नियमाप्रमाणे खरेदीखत नोंदवतो - एन. ए. शेख, दुय्यम निबंधक, परळी