बीडमधील चोरट्यांचा काही नेम नाही ! पीपीई कीट घालून मेडिकल फोडले, आता ५० कबुतरांची चोरी !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:31 PM2020-09-12T12:31:25+5:302020-09-12T12:40:20+5:30
कोरोना महामारी काय काय दिवस दाखविणार आहे, ठाऊक नाही.
बीड : बीडमधील चोरट्यांचा काही नेम नाही. ते कशी आणि कशाची चोरी करतील हे सांगता येत नाही. पीपीई कीट घालून मेडिकल फोडल्याची घटना याच शहरात घडली. आता चोरट्यांनी ५० कबुतरांवर हात साफ केल्याची घटना घडली. या जिल्ह्यातले पोलीसदेखील वेगळेच. झाड खाल्ले म्हणून गाढवाला डांबून ठेवणारे पोलीस याच जिल्ह्यातले.
कोरोना महामारी काय काय दिवस दाखविणार आहे, ठाऊक नाही. मागील आठवड्यात चोरट्यांनी बीडमधील भरचौकातील मेडीकल दुकान चक्क पीपीई किट घालून फोडले. हे चोरटे मास्क आणि हॅण्डग्लोज घालायलादेखील विसरले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत चोरट्यांनी त्यावेळी गल्ल्यातून ६० हजारांची रोख पळविली होती. शहरात या पीपीई किटवाल्या चोरट्यांची चर्चा खूप रंगली होती.
या चोरट्यांचा शोध लागणे बाकी असतानाच आता दिंद्रुड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माजलगाव तालुक्यातील उमरी येथे तर चोरट्यांनी चक्क ५० कबुतरे चोरुन नेली. उमरी रस्त्यावर असलेल्या एका गॅरेज शेजारी एकाने ही कबुतरे पाळली होती. चोरट्यांनी या कबुतरावरच हात मारला. तक्रार केली तर आपणच अडचणी येऊ म्हणून मालकाने तक्रार केली नाही. परिणामी पोलीस ठाण्यात कुठलीच नोंद झाली नाही. त्यामुळे या चोरट्यांचा आणि ५० कुबतरांचा शोध लागण्याचा प्रश्न नाही.