‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:28+5:302021-07-22T04:21:28+5:30
कडा : समाज माध्यमावर संदेश टाकून उपअधीक्षक यांचे पथक दारू पकडण्यासाठी रवाना झाल्याचा प्रकार समोर आला. ‘लोकमत’ने हा प्रकार ...
कडा : समाज माध्यमावर संदेश टाकून उपअधीक्षक यांचे पथक दारू पकडण्यासाठी रवाना झाल्याचा प्रकार समोर आला. ‘लोकमत’ने हा प्रकार रविवारी समोर आणला; पण या कर्मचाऱ्यांवर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याने वरिष्ठांकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांच्या उपविभागीय पोलीस कार्यालयात अवैध धंदे रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. गोपनीय माहिती काढून कारवाया करणे, हद्दीत दारूबंदी करणे यांसह अवैध धंदे बंद करण्याचे काम या विशेष पथकाला दिले असले तरी यातील तीन कर्मचारी गुरुवारी कारवाई करण्यासाठी समाज माध्यमावर संदेश टाकून रवाना झाले होते. ‘अवैध दारू पकडण्यासाठी पथक रवाना’ असा तो संदेश होता. विशेष म्हणजे त्या दिवसभरात एकही कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यासाठी जाताना गोपनीय माहिती ठेवणे बंधनकारक असतानादेखील त्यांनी हे धाडस केले. ‘लोकमत’ने रविवारी बातमी प्रसिद्ध केली; पण अद्याप या कर्मचाऱ्यांवर कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याने पोलीस प्रशासन नेमकं कोणाला पाठबळ देतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोपनीय माहिती उघड करणाऱ्यास पाठीशी का घालत आहे, हेच कळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, नाराजीचे पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.