माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, तर प्रशासन सुस्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
वरील गावांना ८ तास वीज सातत्याने व उच्च दाबाने मिळावी म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन २४ नोव्हेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी १५ दिवसात वरील गावांना मालीपरगाव ३३ के. व्ही. उप केंद्रावरून विद्युत पुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत वीज पुरवठ्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. सध्या जनतेला ,जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देता येत नाही. म्हणून नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.
गुरूवारी भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष व तीन गावचे प्रतिनिधी संबंधित कार्यालयास भेटण्यासाठी गेले असता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले, त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. आता जनतेने वीज नसल्यामुळे पिण्यासाठी व शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी कोणाकडे जावे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. सर्व अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत. शिवाय या कोरोनाच्या परीस्थितीत आंदोलनही करता येत नाही. जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन जनतेचा प्रश्न तत्काळ सोडवावा. जनतेला रस्त्यावर येण्यास भाग पाडू नये असे निवेदन भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केली आहे.
------
अशीही टोलवाटोलवी
वाघोरा येथील नागरिक या गावांना मालीपारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रावरून जोडू देत नाहीत. तेथे दोन दिवस काम करावे लागते. ते काम कामगारांना करू दिले जात नाहीत. त्यासाठी पोलीस यंत्रणा आवश्यक आहे. परंतु पोलीस अधिकारी पोलीस बंदोबस्त देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक,उपविभागीय पोलीस आधिकारी व तहसीलदारांना पत्र दिले. यावेळी तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांकडे जा, यात आम्ही काय करणार ? असे उत्तर तहसीलदारांकडून मिळाले. तर पोलीस ठाण्यात आम्ही निवेदन घेऊ शकत नाहीत, साहेब आल्यावर त्यांना भेटून निवेदन देण्याचे सांगण्यात आले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास कुलूप लावलेले होते.
-----------