थरारक! ३ लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण; १४ तासांत आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:54 AM2023-03-27T11:54:00+5:302023-03-27T11:55:01+5:30
सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीच्या आवळल्या मुसक्या; आष्टी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कडा(जि.बीड) - तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून २५ रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १४ तासांत रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान भिगवण येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या सिनेस्टाईल पध्दतीने कारवाई करणाऱ्या आष्टी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे २५ मार्चच्या रात्री अज्ञात कारणांसाठी अपहरण झाले होते. मुलीच्या वडिलांना ३ लाखांच्या खंडणीसाठी वारंवार वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले होते. आष्टी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तांत्रिक माहितीच्या आधारे थेट भिगवण गाठले. रविवारी दुपारी आष्टी पोलिसांनी सापळा रचला. आम्ही पैसे घेऊन भिगवण-इंदापूर रोडवर उभा असल्याचे सांगितले. आरोपी पैसे घ्यायला येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तेथील एका हाॅटेलमधील खोलीत कोंडून ठेवलेल्या मुलीची सुखरूप सुटका करत वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अवघ्या १४ तासांच्या आत सिनेस्टाईल पध्दतीने आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी भिगवण येथील आकाश बंडगर (२६) याला ताब्यात घेतले आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलिस अंमलदार शिवप्रकाश तवले, पोलिस नाईक विकास जाधव, महिला पोलिस हवालदार स्वाती मुंडे, पोलिस अंमलदार सचिन कोळेकर यांनी केली.