बीड: बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची धावत्या दुचाकीवर अंधारात चाकूने सपासप वार करुन हत्या केली. हा थरार २२ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहराजवळील मंझेरी शिवारातील शांतिवन नजीक घडला. हत्येनंतर मारेकरी त्याच दुचाकीवरुन पळून गेला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
ब्रम्हदेव हनुमान कदम (२६, रा. मंझेरी ता.बीड) असे मयताचे नाव आहे. सिध्देश्वर उर्फ लक्ष्मण पांडुरंग बहिरवाळ (रा.मंझेरी ता.बीड) असे आरोपीचे नावे असून तो फरार आहे. ब्रम्हदेव कदम हा अविवाहित असून शेती करायचा. मित्र सिद्धेश्वरची बहीण नांदत नसून एकमेकांच्या घरी येणे- जाणे असल्याने तिचे व ब्रम्हदेवचे सूत जुळले. त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची भणक सिध्देश्वरला लागली होती. २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रम्हदेव हा समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ यांच्यासमवेत जेवणासासाठी मंझेरी फाट्यावर गेला होता. दहा वाजता ब्रम्हदेव यास सिध्देश्वर बहिरवाळने फोन करुन कुठे आहे , असे विचारले. त्यावर त्याने धाब्यावर जेवण करत असल्याचे सांगितले.
दहा ते पंधरा मिनिटांनी सिध्देश्वर बहिरवाळ तेथे पोहोचला. त्याने जेवण केले नाही. त्यानंतर तिघे दोन दुचाकीवरुन गावी जाण्यास निघाले. समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ एका दुचाकीवर तर ब्रम्हदेव कदम व सिध्देश्वर बहिरवाळ दुसऱ्या दुचाकीवर होते. ब्रम्हदेव हा दुचाकी चालवित असताना शांतिवनजवळ पाठीमागे बसलेल्या सिध्देश्वर बहिरवाळने त्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले. दुचाकीचा ताबा सुटल्यावर दोघेही खाली पडले. त्यानंतर समोरील दोघे परत आले तेव्हा सिध्देश्वर बहिरवाळच्या हातात चाकू व ब्रम्हदेवक कदम बेशुध्दावस्थेत पडलेला आढळला. त्यास रोखण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीवरुन तो पसार झाला. त्यानंतर दोघांनी ब्रम्हदेवला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी मयत घोषित केले.
आरोपीचा शोध सुरुदरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक (गृह) श्रीपाद परोपकारी, बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि.संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक देवीदास आवारे,हवालदार पी.टी.चव्हाण, आनंद मस्के, पो.ना.विजय जाधव, गणेश कांदे , अनिल घटमळ यांनी भेट दिली. आरोपी फरार असून शोध सुरु असल्याचे पो.नि.संतोष साबळे यांनी सांगितले.