हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:47+5:302020-12-31T04:31:47+5:30
गेवराई : तालुक्यात २०२० हे वर्ष चांगले जाईल, असे वाटत असताना जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने गेवराई तालुक्यातही शिरकाव केला. ...
गेवराई : तालुक्यात २०२० हे वर्ष चांगले जाईल, असे वाटत असताना जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने गेवराई तालुक्यातही शिरकाव केला. २४ मार्चपासून संपूर्ण भारतात लाॅकडाऊन जाहीर झाल्याने सर्व व्यापारीपेठा, बाजार तब्बल अडीच महिने बंद राहिल्याने श्रीमंतापासून गोरगरिबांचे यामुळे मोठे हाल झाले. यात हातावर पोट असणाऱ्या तालुक्यातील हजारो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली.
राजकीय, सामाजिक संघटनांनी त्यांना धान्यवाटप, खिचडी, दोन वेळ जेवणाची चांगली सोय केली. लग्नकार्य व तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या शनीच्या राक्षसभुवन येथील शनी मंदिर व पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ मंदिरे तब्बल ९ महिने बंद होते. त्यामुळे यावर अवलंबित अनेकांचे व्यवसाय कोडमडले. आता मंदिरे व व्यापार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यात पुन्हा कहर म्हणजे, तालुक्यातील दहा मंडळांत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सर्वत्र पाणी झाल्याने पाणीटंचाई भासणार नाही. तसेच जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला. यात तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिर व पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली.
तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ व ६१ गेल्याने दळणवळण वाढले, चांगले रस्ते मिळाले. मात्र, सरत्या वर्षात रस्ते अपघातात तालुक्यातील अनेकांचे जीव गेले. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ धुळे-सोलापूर गेल्याने हिरापूर, पाडळसिंगी, गढी येथे उड्डाणपूल झाल्याने व आता गाड्या सुसाट वेगाने याच पुलावरून जात असल्याने पुलाखाली असलेल्या जुन्या चौफुलीवरील अनेक धंदे ओस पडली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली चहाची दुकाने, फळविक्रीच्या गाड्यासह विविध दुकानदारांची कमाई कमी झाली. परिणामी, अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. या सरत्या वर्षात शाळा, महाविद्यालय शेवटच्या महिन्यात सुरू झाले. २०२० या सरत्या वर्षाला अलविदा करीत नवीन वर्षाचे स्वागत करूया.
गोदावरी नदीला पूर आल्यानंतर तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पाण्याखाली दोन फोटो
दुसरा फोटो आत्मतीर्थ पांचाळेश्वर मंदिर