टिंगल करणारे आता सल्ला मागू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:02+5:302021-04-03T04:30:02+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील जगताप कुटुंबाने मागील १२ वर्षांपासून सेंद्रिय शेती करत यश मिळविले आहे. या ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील जगताप कुटुंबाने मागील १२ वर्षांपासून सेंद्रिय शेती करत यश मिळविले आहे. या शेतीला कालपर्यंत हसणारे, टिंगल करणारे अनेक शेतकरी आता अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांच्याकडे सल्ला मागायला येत आहेत. लागणारे बियाणे व रोपे तसेच पिकांवर फवारणीसाठी लागणारी औषधीदेखील शेतातच तयार करून मोठे उत्पन्न मिळवण्यास जगताप कुटुंबाने सुरुवात केली. याचे फलीत त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘शेतिनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार जाहीर झाला.
बारा वर्षांपूर्वी जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी अण्णासाहेब यांना सेंद्रिय शेतीचा सल्ला देत मार्गदर्शन केले. पहिल्या वर्षी खर्चाएवढे उत्पन्न निघाले. मात्र अण्णासाहेब यांनी जिद्द सोडली नाही. ८ वर्षांपूर्वी एका एकरात २० क्विंटल गव्हाचे उत्पन्न झाले होते. परंतु महाग गहू घेण्यास कोणीच तयार होत नव्हते. या वेळी ‘नाम’चे राजू शेळके यांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथे कृषी प्रदर्शनात या गव्हापासूनचे रवा, शेवई, भरडा आदी नेलेले साहित्य केवळ दोन तासांत हातोहात विकले. अभिनेते नाना पाटेकर यांनीही स्टॉलवर एक तास थांबून अण्णासाहेबांचे साहित्य विकले. या वेळी दीड लाख रुपये मिळाले. या मोठ्या कमाईनंतर शेंद्रिय शेतीत रमलेले अण्णासाहेब जगताप यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
गावरान बियाणे बँक त्यांनी उभारली असून गावरान औषधालयात विविध प्रयोग करून ५०-५२ औषधी बनवली. या ठिकाणी ४५ लाख लीटरचे शेततळे केले आहे. जगताप यांनी शेतात घेतलेल्या काळा गाजर व काळा हरभऱ्याचा कॅन्सरसाठी औषध म्हणून वापर होत असल्याने याला चांगला भाव मिळत आहे. तर त्यांनी पिकविलेल्या गोल आकाराच्या गव्हाला जागेवर सहा हजार रुपये भाव मिळत आहे.
अडीच लाख फॉलोअर्स
अण्णासाहेब यांनी यूट्युब चॅनलवर ‘दिशा सेंद्रिय शेती’ नावाने मार्गदर्शन सुरू केले. त्यांचे २ लाख २७ हजार फॉलोअर्स आहेत. शेतीविषयक अण्णासाहेब यांचे मार्गदर्शन प्रभावी ठरल्याने या चॅनलने त्यांना ट्राॅफी व प्रशस्तिपत्र दिले. त्यांना एका व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त लाईक मिळालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची १२ वर्षांची मुलगी व्हिडिओ तयार करून यूट्युबवर अपलोड करते.
पुरस्काराने मन भरून आले
शेंद्रिय शेती करताना अनेक जण नाव ठेवत होते. परंतु ज्येष्ठ बंधू हनुमंत जगताप, वहिनी शारदा जगताप, पत्नी रंजना, गायत्री व तन्वी या दोन मुलींचे व कृषी खात्यातील सुभाष साळवे, सिद्धेश्वर हजारे यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी टिकून आहे. कसलीही शिफारस नसताना शासनाने दिलेल्या या पुरस्काराने मन भरून आले असून, सेंद्रिय शेतीचे फलीत झाले.
- अण्णासाहेब जगताप, पुरस्कार प्राप्त शेतकरी
शेतीला सकस करणाऱ्यांचा गौरव
सावरगाव येथील शेतकरी अण्णासाहेब जगताप यांनी सेंद्रिय शेतीत खूप मेहनत केली. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेता येते हे सिद्ध करून दाखवले. त्यांची प्रेरणा इतर शेतकऱ्यांना मिळेल. त्यांची पुरस्कारासाठी निवड होणे हे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे.
- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी पंचायत समिती माजलगाव.
===Photopath===
020421\purusttam karva_img-20210402-wa0039_14.jpg~020421\purusttam karva_img-20210402-wa0034_14.jpg