बीड : शहरातील धांडेनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी भरदुपारी अवघ्या ९ मिनिटात घर फोडून चोरट्यांनी २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
शहरातील शिवाजी धांडेनगर भागातील जिजाऊ अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर सुभाष श्रीरंग मुंडे यांचा ८ नंबरचा फ्लॅट आहे. ते एका खासगी बँकेत अधिकारी आहेत. १६ जून रोजी दुपारी मुलाला बूट खरेदी करायचा असल्यामुळे सुभाष मुंडे हे पत्नी व मुलासोबत बाजारात गेले होते. दरम्यान, त्याच काळात चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून आतील रोख ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी आजूबाजूच्या फ्लॅटचे दरवाजे बंद असल्यामुळे कोणालाही याची खबर लागली नाही. दरम्यान, खरेदी करून मुंडे यांना गेवराईला जायचे असल्यामुळे, मुलाला व पत्नीला अपार्टमेंटमध्ये खाली सोडले व ते निघाले. दरम्यान, त्यांच्या पत्नीला चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सुभाष मुंडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी याप्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि साईनाथ ठोंबरे यांना दिली. त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. यावेळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून तपास सपोनि शेख हे करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, चोरटे लवकरच ताब्यात घेतले जातील, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांना आव्हान देत चोऱ्या
चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांना आव्हान देत चोरट्यांनी भरवस्तीत गुन्हे केले आहेत. धांडेनगर भागातील गजबजलेल्या परिसरातील अपार्टमेंटमध्ये अवघ्या ९ मिनिटात घरफोडी केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना ताब्यत घेण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
170621\17_2_bed_19_17062021_14.jpg
===Caption===
मुंडे यांच्या घरातील कपाट फोडून ऐवज लंपास केला.