बीड : जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील नाकले पिंळगाव आणि केज तालुक्यातील साळेगाव येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील नाकले पिंपळगाव येथील शंकर गणपतराव थावरे (४८) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
शंकर थावरे यांना साडेतीन एकर शेती आहे. ते शेतमजुरीचीही कामे करीत. गुरुवारी सकाळी पिंपळगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह जमिनीवर अर्धवट लोंबकळत असल्याचे गावातील लोकांना दिसले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माजलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल पाठविला आहे. दिंद्रुड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले.
नापिकीला कंटाळून साळेगावात आत्महत्या केज तालुक्यातील साळेगाव येथील राहुल श्रीमंत घाटुळे (३०) या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ३ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान ५ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मयताची पत्नी पल्लवी राहुल घाटुळे हिच्या माहितीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो. नि. अमोल गायकवाड करीत आहेत.