परळी- येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॉट क्षमतेचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्रमांक 6 हा सोमवारी रात्री 12 वाजता, तर संच क्रमांक 7 हा मंगळवारी सकाळी 9.30 वाजता बंद करण्यात आला. सध्या एक संच सुरु असून बंद केलेलं दोन्ही संच लवकरच सुरु करण्यात येतील अशी माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील दाऊतपुर- वडगाव शिवारात नवीन औष्णिक विद्युत केंद्र असून या केंद्रात 250 मेगावॉट क्षमतेचे तीन संच आहेत. या तीन संचांपैकी दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत, तर संच ( क्र. 8 ) हा चालू आहे. मंगळवारी दुपारी या एका संचातून 180 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती चालू होती. राज्यात विजेची जास्त मागणी नसल्याने व मिरीटऑर्डर डिस्पॅच रेटमध्ये बसत नसल्याने हे संच बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे. परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन संचबंद ठेवण्यात आले आहेत,ते लवकरच चालू होतील व सध्या एक संच चालू आहे.