दोन दिवसांची रजा टाकून गेलेला शिक्षक आठ वर्षांपासून गैरहजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:34 AM2018-11-29T00:34:39+5:302018-11-29T00:35:07+5:30
दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली.
माजलगाव तालुक्यातील राजेगाव केंद्रांतर्गत असलेल्या वाघोरा जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन हे कार्यरत होते. ८ जुलै २०१० रोजी दोन दिवसांची किरकोळ रजा देऊन ते गेले होते. मात्र ते पुन्हा रुजू झाले नाहीत. अनधिकृतपणे गैरहजर राहिल्यामुळे १५ जून रोजी २०१८ पर्यंत किंवा त्यापूर्वी अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेशित केले होते. मात्र या शिक्षकाकडून खुलासा करण्यात आला नाही. तसेच तो कार्यालयात उपस्थित झाला नाही. माजलगाव पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाºयांनी सदर शिक्षकाचा शोध घेतला असता शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन यांच्या सेवापुस्तिकेवरील मूळ पत्त्यावरही ते रहात नसल्याचे समजल्याने त्याबाबत पंचनामा करण्यात आला. तब्बल आठ वर्षांपासून शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन हे जिल्हा परिषद सेवेत अनधिकृतपणे गैरहजर राहिले. त्याचबरोबर त्यांच्याकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही. तसेच त्यांच्या सेवापुस्तिकेवरील पत्त्यावर ते राहत नसल्याचे स्पष्ट झाल्याने सदर शिक्षकाविरुद्ध शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. सदर शिक्षकाची कृती महाराष्टÑ जि.प.जि. सं. (वर्तवणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करणारी असल्याने सहशिक्षक शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन यांना म.जि.प.जि.से. (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (७) या तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ केले. बुधवारी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची नोंद सदर शिक्षकाच्या मूळ सेवापुस्तिकेत घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
अखेर कुठे गेले अन्वर ?
सहशिक्षक शेख अन्वर हे ८ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
त्यांच्या गैरहजेरीबाबत कुटुंबियांकडूनही शिक्षण विभागाला माहिती अथवा खुलासा मिळू शकलेला नाही.
त्यामुळे शेख अन्वर पाशा हे कुठे आहेत? ते हजर का झाले नाहीत? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.