बीड : जिल्ह्यात मागील सहा महिन्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नऊ दुचाकींसह आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडून ३१ दुचाकी जप्त केल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यात दुचाकी चोरणार्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अमोल रोहिदास झेंडे (रा. नांदेली, ता. शिरूर) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे जास्तीची विचारपूस केल्यास त्याने त्याचा चुलत मेव्हणा राजू साळवे (रा. पैठण, ता. औरंगाबाद) याच्याकडून दुचाकी आणल्याचे सांगितले. आणखी दोन दुचाकी घेतल्या आहेत, अशी माहितीदेखील त्याने दिली. त्यानुसार त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामधील एक दुचाकी ही एमआयडीसी पैठण ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील होती, तर पांचाळेश्वर (ता. गेवराई) येथेसुध्दा त्याच्या नातेवाईकांकडे राजू साळवे याने गाड्या दिल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मण रखमाजी उन्हाळे, भारत मारूती झेंडे, प्रवीण आप्पासाहेब यांच्याकडून प्रत्येकी दोन दुचाकी अशा सहा दुचाकी जप्त केल्या. यातील सहा दुचाकी आरोपींना चकलांबा पोलिसांच्या आणि तीन दुचाकी व एका आरोपीला बीड ग्रामीण पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.