गेवराई ( बीड ) : जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी त्यांची मृतदेह कालव्यात आढळून आली . रविवारी रात्रभर त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. महेश गणेश बहिर (१७ ) व राम चंद्रकांत भिताडे (१८) असे मृत युवकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गंगावाडी येथील महेश बहिर व राम भिताडे हे दोघे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राक्षसभुवन जवळील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले. सध्या कालव्यात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येथील पाण्याची पातळी वाढलेली असून ते प्रवाही आहे. यामुळेच पाण्यात उतरताच त्याचा वेग जास्त असल्याने ते दोघे पाण्यात वाहुन गेले.
याबाबत माहिती मिळताच पोलीस व गावकऱ्यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नव्हते. आज सकाळी ६ च्या सुमारास त्यांची कपडे ज्या ठिकाणी होती तेथेच त्यांची मृतदेह आढळून आली. सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांनीही नुकतीच १२ वीची परीक्षा दिली आहे.